हरवत चाललेली कौटुंबिक मूल्ये
भारतीय समाज व्यवस्थेमध्ये कुटुंब रचनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुळात भारतीय संस्कृतीचा आधारच भारतीय कुटुंब व्यवस्था आहे, आणि म्हणूनच जगाच्या पाठीवर अनेक संस्कृती उदयास आल्या आणि लयास गेल्या; मात्र हजारो वर्षाचा संघर्ष करूनही भारतीय संस्कृती आजही जिवंत आहे तीच मुळी या कुटुंब व्यवस्थेवर. परंतु, सद्यस्थितीत मात्र भारतीय कुटुंब व्यवस्था उध्वस्त होते की काय अशी भीती मनात कुठेतरी तरळून जाते. ज्या संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये एकमेकांचं पालन पोषण स्नेहभरण आपुलकी प्रेम जिव्हाळा संस्कार या आणि यासारख्या अनेक गोष्टींची भर पडत असे आणि त्यातून एक समृद्ध नागरिक एक परिपक्व माणूस तयार केला जात असे .अशी ती कुटुंब व्यवस्था आधुनिक शिक्षणाच्या, जाहिरातीच्या, पाश्चिमात्यांच्या अंधाणूकरणाच्या आणि इंटरनेटच्या मोहोजाळात गुरफटून आपल्या मूल्य संस्काराला तिलांजली देत आहे की काय असे चित्र डोळ्यासमोर दिसत आहे. ज्या कुटुंबामध्ये स्वतःपेक्षा इतरांची काळजी घेण्यासाठी शिकवलं जायचं, स्वतः खाण्याच्या अगोदर आपल्या ताटातील काही हिस्सा इतरांसाठी ठेवला जायचा, इतरांच्या सुखामध्ये आपलं सुख मानलं जायचं त्या कुटुंबामध्ये आता मात्र स्वतःचे आई-वडील देखील ओझं वाटायला लागले आहेत; आणि, त्यांची रवानगी खाजगी वृद्धाश्रमात केली जात आहे. हे पाहून मनामध्ये अनेक प्रश्नांचे काहूर निर्माण होतं. का बर असं होत असेल? हे एकदम अचानक घडलं का? तर नाही; जाणीवपूर्वक भारतीय कुटुंब व्यवस्था उध्वस्त करण्याचे प्रयत्न केले जात आहेत की काय अशी शंका मनात कुठेतरी येऊन जाते. विनोबा भावे यांच्या जीवनातील एक प्रसंग मला आठवतो, विनोबा भावेंना फणस अत्यंत आवडायचा त्यांच्या दारामध्ये एक फणसाचे झाड होतं एके दिवशी विनोबा आपल्या आईला सांगतात आई मला फणस कापून देणार? मला फणस खूप आवडतो त्याप्रमाणे विनोबांची आई फणस कापून घेते, विनोबांना घरातून मोठं ताट आणायला सांगितलं जातं, आई फणस कापते आणि त्याच्यातील चार चार गऱ्यांचे गठ्ठे करून त्या ताटामध्ये ठेवते. विनोबांना वाटतं आपल्याला त्रास होऊ नये म्हणून कदाचित आई असे चार चार गऱ्यांचे गठ्ठे करून ताटामध्ये ठेवत असेल. विनोबा आईला म्हणतात आई मी खाऊ का ग? पण त्यांची आई सांगते अरे विनोबा या ताटातले सर्व घरे अगोदर आपल्या गल्लीमध्ये सर्वांच्या घरी देऊन ये, आणि शेवटी जे चार गरे उरतील ते तू खाऊन टाक. म्हणजे, पूर्वीच्या कुटुंबात फक्त स्वतःच्या घराचा नव्हे तर शेजाऱ्यांच्या घराचा आणि त्यांच्या घरातील मुलांचा सुद्धा तेवढाच आत्मीयतेने विचार केला जायचा. हा संस्कार विनोबाजींच्या आईने त्यांच्यावर केला आणि म्हणूनच विनोबाजींनी देखील आपलं जीवन समाजासाठी अर्पण केलं. कारण त्यांच्या कुटुंबात झालेला तो संस्कार होता. मात्र आजच्या शिक्षण पद्धतीनुसार आणि छोट्या होत चाललेल्या कुटुंबामध्ये जेव्हा एखादा मुलगा सहलीला निघतो तेव्हा त्याची आई त्याला ठासून सांगते तुझ्या डब्यामध्ये दोनच सँडविच दिलेले आहेत विनाकारण मित्रांमध्ये वाटत बसू नको. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एकट्यानेच ते सँडविच खाऊन टाक. कोणाला देऊही नको आणि कोणाचं काही घेऊही नको. दिवसेंदिवस आम्ही किती स्व केंद्रीत बनत चाललेलो आहोत याचेच हे उदाहरण आहे. आई आणि वडील दोघेही नोकरीला जातात शाळेतून आलेल्या मुलाला एका विशिष्ट ठिकाणी ठेवलेली चावी घेऊन आपलं घर उघडायचं आणि फ्रीज मध्ये ठेवलेले जे काही अन्न असेल ते खाऊन त्याच्यावरच समाधान मानायचं. अंगण हरवत चाललेली कुटुंबे याच्यातच समाधान मानायला लागली की आमची मुलं खूप लवकर स्वावलंबी झाली आहेत. ते स्वतःच काम स्वतःच करत आहेत. परंतु, यात स्वावलंबनाचा आणी स्वातंत्र्याचे स्वैराचारात कधी रूपांतर होत आहे हेच आजच्या पालकांना कळेनासं झालेलं आहे. आणि, म्हणून आठवी - नववी ला गेलेली आमची मुलं कधी व्यसनाच्या आहारी चाललेली आहेत- सिगारेट तंबाखू गुटखा दारू या व्यसनाच्या वेढ्यात कधी गुरफटून गेली हेच आई वडिलांना समजेना झाले आहे. कारण आई-वडील दोघांनाही नोकरीतून वेळच मिळत नाही. ते आपल्या मुलांशी संवाद कधी साधणार, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा केव्हा मारणार? जशी जशी कुटुंबे छोटी होत गेली तशी तशी कुटुंबातील नात्यांमधील अंतर वाढत गेलं. जगण्यासाठी पैशाची गरज असते हे विसरून आम्ही पैशासाठी जगायला लागलो. आणि, तिथेच कुटुंबाचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली. सुरुवातीला कुटुंबामध्ये तीन-तीन पिढ्या एकत्र राहायच्या. आई, वडील, आजी, आजोबा आपली मुलं. आपण जरी कामाला गेलो तरी आई-वडिलांचं आजी आजोबांचं आपल्या मुलांकडे लक्ष असायचं. संध्याकाळ झाली की आजी मुलांना घेऊन साय वंदना, रामायण, महाभारतातील गोष्टी असतील किंवा संस्काराच्या अनेक कथा असतील ती सांगायची. मुलींना आपलं मन मोकळं करायला हक्काचं ठिकाण असायचं. आई जरी ड्युटीला गेलेली असली तरी काकू असायची, आजी असायची, दीदी असायची. कोणाजवळ तरी आपलं मन मोकळं करून मनातील समस्यांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जायचा. मुलांच्या बाबतीतही तसंच. घरामध्ये मोठा भाऊ असायचा, चुलत भाऊ असायचा, काका असायचे, आजी असायची, आजोबा असायचे. यांच्याशी गप्पा मारून त्याचेही मन मोकळ व्हायचं. तो किंवा ती कधी चुकीचं वागत असेल तर त्यांच्यावर घरातील कोणाचं ना कोणाचा तरी लक्ष असायचं. आणि आपल्याकडे कोणीतरी पहात आहे या आदर युक्त भीतीने तरी किमान घरातील लहान मुलं मर्यादित राहायची. परंतु सद्यस्थितीत मात्र हम दो आणि हमारे दो किंबहुना हम दो हमारा एक असं त्रिकोणी आणि चौकोनी कुटुंब झाले आहे. घरात एकमेकांशी मनमोकळे बोलायला कोणालाही वेळ नाही. आई-वडील नोकरी करतात, मग घरामध्ये असलेल्या लहान मुलीने स्वतः स्वतःचे केस विंचरायचे, स्वतःच घर आवरायचं , स्वतःच दप्तर स्वतः भरायचं, आपला डब्बा आपणच घ्यायचा. अचानक कोणाचा घरी फोन आला तर फोन उचलून सांगायचं आई-बाबा घरी नाहीयेत कामाला गेलेली आहेत, काही निरोप द्यायचा का? या सगळ्या जबाबदाऱ्या निभवता निभवता ती स्वतःच बालपण हरवून जात आहे. प्रत्येकाच्या हातात आलेल्या मोबाईलमुळे प्रत्येक जण स्वतःसाठी कुठेतरी आधाराचं ठिकाण शोधत आहे. स्वतःला व्यक्त होण्याची ठिकाण शोधत असताना त्यांचा कोणीतरी गैरफायदा घेत आहे आणि मग मुली अथवा मुलं कुठेतरी नको त्या आकर्षणामध्ये गुरफटून जात आहेत.त्या माध्यमातून आयुष्यामध्ये नको असलेल्या चुका त्यांच्या हातून घडत आहेत. परंतु, हे सर्व समजून घ्यायला आई-वडिलांना वेळच नाही. आर्थिक दृष्ट्या आम्ही सधन बनत आहोत, समाजातील इतर कुटुंबासोबत तुलना करता करता आम्ही स्वतःच्या घरातील घरपण हरवत चाललो आहोत. भौतिक सुख सुविधा मिळवता मिळवता आत्मिक समाधान आणि कुटुंबातील आपुलकी हीच संपत चाललेली आहे. घरात येणाऱ्या पाहुण्यांचा आदर सत्कार करायला वेळ नाही, त्यामुळे घरात आलेली पाहुणे नातेवाईक आम्हाला नकोशी झालेले आहेत. दिवसेंदिवस आम्ही समूहातून एकाकीपणाकडे प्रवास करत चाललो आहोत या सर्व धावपळीमध्ये मात्र आम्ही स्वतःचं समाधान, कुटुंबाचं समाधान, नात्यातली आपुलकी आणी समाजातील नाती या सर्वांपासून तुटत चाललेलो आहोत. आणि म्हणून आज जेव्हा समाजाचा विचार केला जातो तेव्हा असे लक्षात येते की करिअरच्या मागे धावता धावता आम्ही स्वतःचं जगणं हरवत चाललो आहोत की काय हा यक्षप्रश्न डोळ्या सर्मोर उभा राहतो. समाजाचं सुदृढ पण याचं मोजमाप करताना अत्यंत दुर्दैवाने हे कबूल करावा लागतं की आज समाजातील 60% समाज निराशेने ग्रासलेला आहे. ,एन्जॉयटी डिप्रेशन, एकटेपणा, मानसिक ताण या सर्व आजाराने आम्हाला ग्रासून टाकलेला आहे. जेव्हा या सर्वांच्या मुळाशी जाण्याचा मी प्रयत्न करतो, तेव्हा असं वाटून जातं की या सर्वाला कारणीभूत काय आहे? तेव्हा असं लक्षात येतं आमची मुकी होत चाललेली घरे हेच या सर्व प्रश्नांच्या मुळाशी असलेले कारण आहे. जोपर्यंत घरातील संवाद सुदृढ होत नाही, पैसा कमावण्याच्या पलीकडे देखील कुटुंबातील मुलांचं फक्त पालन नव्हे तर भरणपोषण होत नाही, त्यांच्यावर आमच्या संस्कृतीचे आजी आजोबांचे संस्कार होत नाहीत, जोपर्यंत आम्ही त्याला माणूस म्हणून बनवत नाही, जगण्याचं उद्दिष्ट उपभोगात नव्हे, तर त्यागात आहे, एकटेपणात नव्हे तर समूहात आहे, अबोलात नाही तर संवादात आहे, हे आम्ही आमच्या मुलांना शिकवत नाही, त्यांच्यासाठी घराचा अंगण मोकळं करत नाही, त्यांना हवा असेल तेव्हा मोकळा वेळ आम्ही देऊ शकत नाही, त्यांच्या अडचणीच्या वेळी जोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत थांबू शकत नाही; तोपर्यंत आमच्या घराला घरपण येणार नाही. कवयित्री विमल लिमये यांनी घराचे घरपण सांगताना एके ठिकाणी असं म्हटलं आहे
घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती.
तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती
सद्यस्थितीत मात्र घर म्हणजे चार भिंती आणि वर असलेले छत याच्या पलीकडे काही दिसत नाही. दुर्दैवाने घराचं घर पण आम्ही हरवून बसलो आहोत. करिअरच्या, पैसा कमावण्याच्या, धावण्याच्या, इतरांपेक्षा पुढे जाण्याच्या स्पर्धेत आम्ही आमच्या कुटुंबाला केव्हाच मागे सोडलेले आहे. आणि म्हणून मनाला राहून राहून कुठेतरी असं वाटतं खरंच आम्ही आमची कुटुंब व्यवस्था उध्वस्त करत चाललो आहोत का? ज्या कुटुंब व्यवस्थेच्या जोरावर हजारो वर्ष भारतीय संस्कृती जगाच्या पाठीवर ताठ मानेने उभी राहिली तीच कुटुंब व्यवस्था आम्हाला आमच्या समाजाला आणि आमच्या देशाला खरंच योग्य दिशेकडे घेऊन जात आहे का? याचा विचार करण्याची वेळ आज आपल्या सर्वांवर येऊन ठेपलेली आहे.
जीवन साळुंके
.jpeg)
दुर्दैवाने सध्या हीच वस्तुस्थिती आहे ..
उत्तर द्याहटवावास्तवदर्शी सुंदर लेख...
उत्तर द्याहटवा